अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कचेरी रोड ते गलवाडे रोड या मार्गावरील मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरात बेशिस्त पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्तपणे उभी केली जाणारी चारचाकी आणि दुचाकी वाहने यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, स्थानिक नागरिकांसह वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंगलमूर्ती चौक हा अमळनेर शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, चौकात तसेच प्रबुद्ध विहाराजवळ रस्त्याच्या कडेला बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी, समोरासमोर वाहने आल्यास मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. गर्दीच्या वेळेत तर या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

या बेशिस्त पार्किंगचा सर्वाधिक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून सुरक्षितपणे चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास होत आहे. परिसरात वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत असून, बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांचा धोका आणखी वाढला आहे. वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येची दखल घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी नियमित वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच नियमित गस्त घालून बेशिस्त पार्किंगला आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी अमळनेरकरांकडून होत आहे.


