सायकलींग करा आणि तंदुरूस्त रहा : वरिष्ठ अधिकार्‍यांची आरोग्य चळवळ ( व्हिडीओ )

जळगाव जितेंद्र कोतवाल । कोरोनाच्या आपत्तीत अगदी भयंकर तणावात काम करूनही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सायकलींगचा छंद हा दैनंदिन जीवनाचा भाग बनविला आहे. कोरोनामुळे आरोग्य ही आयुष्यातील सर्वाधीक मोलाची बाब असल्याचे जगाने मान्य केले असतांना या दोन अधिकार्‍यांमुळे जळगावात सायकलींगची चळवळ रूजण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे आपले जीवन आमूलाग्र बनलले आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम आवश्यक असल्यामुळे आता अनेक जण आपापल्या परीने व्यायाम करत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, कोरोनासाठीच्या नियमांचे पालन करून व्यायाम करणे हे वाटते तितके सोपे नाही. नेमक्या याच सर्व समस्यांवरील उत्तर म्हणजे सायकलींग होय. सायकल चालवणे हे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. हौशी सायकलींग ते व्यायाम म्हणून याचा करण्यात येणारा वापर यात खूप मोठा फरक आहे. खरं तर सायकलींग हा व्यायामाचा जगमान्य प्रकार असून आपल्याकडे याची लोकप्रियता वाढत आहे. कोरोनामुळे अर्थातच याला गती आली आहे. या अनुषंगाने जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी पुढाकार घेऊन याला एक आरोग्य चळवळीचे स्वरूप देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

प्रतापराव पाटील हे आधीपासून सायकलींग करत होते. जळगाव येथे बदली झाल्यानंतर प्रारंभी मेहरूण तलावाच्या ट्रॅकवर सायकल चालवत असत. तेथे अन्य सायकल चालवणार्‍यांशी त्यांचा परिचय झाला. अर्थात, यातूनच सायकलर्सचा ग्रुप देखील तयार झाला. दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले हे देखील सायकलींगचे चाहते असून ते बर्‍याचदा मेहरूण तलावाच्या काठावर सायकलस्वारी करत असल्याचे आधी अनेकदा दिसून आले होते. प्रतापराव पाटील यांच्याशी झालेल्या वार्तालापातून डॉ. पंजाबराव उगले यांनी सायकलर्स ग्रुपसोबत लांबची सफर करण्याची इच्छा व्यक्त केली. यातून आज जळगावातील त्यांच्या निवासापासून ते पद्मालय गणेश मंदिरापर्यंत सायकलींग करण्यात आली.

दरम्यान, पद्मालय येथे पोहचल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना डॉ. पंजाबराव उगले यांनी बहुतांश क्रीडा प्रकार हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तर, सायकल चालवणे हा अतिशय उत्तम व्यायाम असून सध्याच्या स्थितीत नागरिकांनी याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. आपण नाशिक येथे असल्यापासून नियमितपणे सायकल चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर जळगावात रस्त्यावर अनेकदा सायकल चालवली असली तरी ग्रुप सोबत पहिल्यांदाच दूरवर आल्याची माहिती त्यांनी दिली. तर प्रतापराव पाटील यांनी आपण दररोज किमान २० किलोमीटर तरी सायकल चालवत असल्याची माहिती दिली. आधी जळगावात सायकलस्वारांचा ग्रुप असला तरी तो तितका सक्रीय नव्हता. आता, या माध्यमातून एका चळवळीला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा डॉ. पंजाबराव उगले व प्रतापराव पाटील यांच्या सायकलस्वारीबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/964049887443484

Protected Content