Home Cities जळगाव पाण्यासाठी जळगाव धावले! ‘महा वॉकेथॉन २०२६’मधून जलसंधारणाचा महासंदेश

पाण्यासाठी जळगाव धावले! ‘महा वॉकेथॉन २०२६’मधून जलसंधारणाचा महासंदेश

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह पाणी बचत आणि जलस्रोतांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी जळगाव शहरात ‘महा वॉकेथॉन २०२६ रनिंग स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पाणी वाचवा, पाण्याचा योग्य वापर करा आणि जलस्रोतांचे संरक्षण करा, असा संदेश देण्यात आला.

महा वॉकेथॉनमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, वनविभागाचे सनदी अधिकारी सौरीश सहाय, नशिराबाद नगरपालिकेचे अध्यक्ष योगेश पाटील, जलसंधारण विभागाचे राज्यस्तर कार्यकारी अभियंता अमोल पाटील तसेच लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता अविनाश पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना जलसंधारण आणि पाणी बचतीबाबत शपथ देण्यात आली. जलसंपत्तीचे संवर्धन करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या वॉकेथॉनमधून पाण्याचे महत्त्व, भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य आव्हाने आणि उपलब्ध जलस्रोतांचे जतन करण्याची आवश्यकता याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हा उद्देश या उपक्रमामागे होता.

जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढविणे, पावसाचे पाणी अडविणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे शक्य होते. त्यामुळे अशा जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जलसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागामुळे महा वॉकेथॉनला विशेष महत्त्व प्राप्त झाले. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Protected Content

Play sound