जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, तसेच नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा पोलिस दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाने मिळून तब्बल ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई केली असून, एकूण ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सणांच्या काळात रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढते. त्यातून वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सकाळी, सायंकाळी तसेच रात्री ११ वाजेपर्यंत विशेष तपासणी आणि वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ८५३ जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ३८ जणांवर, बेकायदेशीर पार्किंगप्रकरणी ५४१ जणांवर, मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ अंतर्गत १३४ जणांवर आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेण्याच्या प्रकारांवरही पोलिसांनी विशेष लक्ष दिले. या मोहिमेत ५८ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सिग्नल उल्लंघन करणारे ४९, ट्रिपल सीट वाहन चालविणारे ५५९, वाहनात बदल केलेले किंवा Modified Silencer वापरणारे १५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणारे १२० आणि ट्रकला आवश्यक दिवे किंवा रिफ्लेक्टर नसलेल्या ७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. Wrong Side Driving करणाऱ्या ९ वाहनचालकांवर, विना परवाना शालेय वाहतूक करणाऱ्या ११२ वाहनांवर, शाळा व महाविद्यालय परिसरातील नियमभंगाबाबत १९७ प्रकरणांमध्ये तसेच MIDC परिसरातील १० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. याशिवाय इतर मोटार वाहन कायद्यांतर्गत २,८५४ प्रकरणे नोंदविण्यात आली.
जळगाव जिल्हा पोलीस दलाने या विशेष मोहिमेत एकूण ५,६७० प्रकरणांमध्ये कारवाई करून ३९ लाख ७० हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला. तर महामार्ग सुरक्षा पथकाने १,४३५ प्रकरणांमध्ये कारवाई करत १२ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. दोन्ही यंत्रणांची मिळून एकूण ७,१०५ प्रकरणे झाली असून, दंडाची रक्कम ५२ लाख ४५ हजार ५५० रुपये इतकी आहे. या मोहिमेचे सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष निरीक्षण व मॉनिटरिंग केले. सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा आणि महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रस्त्यांवरील उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सणांचा आनंद घेताना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक वाहनचालकाने हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये आणि रस्त्यावर इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा आणि महामार्ग सुरक्षा पथक यांच्या समन्वयाने राबविण्यात आली.



