सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यात सावदा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध कंपन्यांचे एकूण सुमारे १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेऊन ते त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सावदा पोलीस ठाण्यात मोबाईल फोन हरवल्याबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गहाळ नोंदवहीतील मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक तपासण्यात आले. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून गहाळ मोबाईलचा माग काढण्यात आला.

तांत्रिक तपासातून भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी वापरात असलेले गहाळ मोबाईल पोलिसांनी शोधून हस्तगत केले. यामध्ये वाघोदा खुर्द येथील विलास कोळी यांचा २० हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल, रोझोदा येथील कमलाकर पाटील यांचा २० हजार रुपये किमतीचा Realme मोबाईल, वाघोदा बु. येथील विनोद जगन्नाथ वाघ यांचा १२ हजार रुपये किमतीचा Redmi मोबाईल आणि फैजपूर येथील शेख फरहान शेख इरफान यांचा १२ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल यांचा समावेश आहे. तसेच कळमोदा येथील प्रशांत जावळे यांचा १० हजार रुपये किमतीचा Motorola मोबाईल, मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यातील ‘प्रॉपर्टी मिसिंग’ प्रकरणातील १५ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल आणि अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे दोन Apple iPhone पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांची माहिती पडताळून पाहण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधून काढल्याने नागरिकांमध्ये सावदा पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ मोहसीन पठाण, पोहेकॉ विनोद तडवी, पोहेकॉ झाकीर मन्सूरी आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी यांनी गहाळ मोबाईलचा तांत्रिक तपास करून त्यांचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



