Home प्रशासन आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; यावल डेपोच्या ताफ्यात दाखल...

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; यावल डेपोच्या ताफ्यात दाखल झाल्या ५ नवीन एसटी बसेस!

0
5

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून नादुरुस्त आणि भंगार बसगाड्यांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या यावल एसटी आगाराला अखेर दिलासा मिळाला आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, यावल आगाराला तब्बल पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेस मिळाल्या आहेत. नव्या बसेस दाखल होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, २३ ऑगस्ट रोजी या बसेसचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

यावल एसटी आगार गेल्या अनेक दिवसांपासून गरजेपेक्षा अधिक नादुरुस्त आणि भंगार अवस्थेतील बसगाड्यांमुळे चर्चेत होते. जुन्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना अनेकदा गैरसोयींचा सामना करावा लागत होता. त्यातच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी बससेवा ही दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असल्याने आगाराला नव्या बसगाड्यांची आवश्यकता होती. प्रवाशांचा ‘लालपरी’वरील विश्वास आणि प्रेम कायम असल्याने उपलब्ध बसगाड्यांच्या माध्यमातूनही यावल आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यातील इतर आगारांच्या तुलनेत आपली कामगिरी टिकवून ठेवली. तत्कालीन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन तसेच नव्याने रुजू झालेले आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दरम्यान, रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी यावल आगाराच्या बसगाड्यांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे यावल आगाराला पाच नव्या बसेस मंजूर होऊन प्रत्यक्षात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या व नादुरुस्त बसगाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून, स्वराज्य संकल्पनेमागे राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ नव्या बसगाड्यांना ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या ‘जिजाऊ’ बसेसपैकी पाच बसेस प्रथमच यावल एसटी आगाराला मिळाल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावल आगाराचे आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पाचही नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर यावल तसेच परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली आणि सुरक्षित एसटी सेवा मिळण्यास मदत होणार आहे. नव्या बसेस मिळाल्याने यावल आगाराच्या बससेवेला अधिक बळकटी मिळणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. अनेक दिवसांपासून नव्या बसेसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


Protected Content

Play sound