केळी बागांवर आढळला कुकुंबर मोझॅक व्हायरस

रावेर प्रतिनिधी । रावेर यावल तालुक्यातील लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाच्या (कुकुंबर मोझॅक व्हायरस) प्रादुर्भावाची सुरुवात होत असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या पाहणीत आढळून आले आहे. 

रावेर तालुक्यातील रसलपूर, चिनावल, ऐनपूर, रोझोदा, कळमोदा या ठिकाणी तर  यावल तालुक्यातील न्हावी, बोरखेडा  या गावांच्या शेती शिवारात या रोगाची प्राथमिक अवस्थेतील लक्षणे आढळून आली आहेत. तर कोचुर, पुनखेडा, रसलपूर, मुंजलवाडी, कुसूंबा या ठिकाणी केळीवरील इर्व्हिनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी दिली आहे.    

रावेर व यावल तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड  केली जाते. मात्र दरवषी केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी गारपीट, वादळ तर कधी विविध रोगांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याचा परिणाम केळीचे उत्पादन घटण्यावर होतो. गेल्यावर्षी तालुक्यातील केली बागांवर मोठ्या प्रमाणावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रावेर व यावल तालुक्यातील काही गावांमधील बागांवर सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस )

सीएमव्ही रोगाची लक्षणे

हरितद्रव्य (इन्फेक्शियस क्लोरोसिस)लोप पावणे हे सीएमव्ही रोगाचे प्रमुख लक्षण आहे. केळीच्या झाडाच्या पानांच्या शिरातील हरितद्रव्य नष्ट झाल्याने शिरातील उतींचा ऱ्हास होऊन त्या मृत पावतात. त्यामुळे पानांवर पिवळसर सोनेरी रेषा किंवा अनियमित चट्टे दिसून येतात. पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते. झाडाची वाढ खुंटून कालांतराने झाड मरते. या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो.

तज्ञानी सुचविलेले उपाय

विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी रासायनिक उपाय नसल्याने त्याचा प्रसार रोखणे व या रोगामुळे होणारे नुकसान  नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. विषाणूजन्य रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदामार्फत होतो. त्यामुळे लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतिसंवर्धन प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत.

काय काळजी घ्यावी

रोपनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृबाग असणे आवश्यक आहे.

परप्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणू नयेत. यासाठी संसर्गरोग उपायांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावी. बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारचे तण काढून स्वच्छता ठेवावी. बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये. बागेभोवतीचे रानकारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.

सीएमव्ही रोगाच्या नियंत्रणासाठी

मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून केळीबागेवर फवारणी करावी.

इर्व्हिनिया रॉटचे नियंत्रण

१)नवीन लागवड केलेल्या केळी बागेच्या क्षेत्रात १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड, ३०० मिली क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी, १५  ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन यांचे द्रावण तयार करून प्रत्येक झाडास २०० मिली द्रावण टाकावे . २) लागवडीच्या वेळी जमिनीतून ६ ग्रॅम ब्लिचिंग पावडरची भुकटी प्रति झाड द्यावे. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने चार वेळा हीच प्रक्रिया करावी. लागवडीनंतर १ महिन्याने ५०० पीपीएम स्ट्रेप्टोसायक्लिन द्रावणाची एक ते दोन लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी.

३) लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक ५० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून द्यावे.

 

Protected Content