मृत्यू प्रकरणात निरपराध व्यक्तीला गोवण्याचे प्रयत्न : निळे निशाण संघटनेचा आरोप

भुसावळ प्रतिनिधी । दीपनगर येथील वीज निर्मिती प्रकल्पात झालेल्या मृत्यू प्रकरणात निरपराध व्यक्तीला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निळे निशाण संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात २ फेब्रुवारी रोजी सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत संजय बळीराम बर्‍हाटे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांवर दडपण टाकून ज्यांचा संबंध नाही त्यांची नावे गोवल्याचा आरोप निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी आनंद बाविस्कर म्हणाले की, दीपनगरात मृत बर्‍हाटे यांच्या मारहाण प्रकरणात विद्युत केंद्राचे सुरक्षा रक्षक संजय लोकरे, सागर मोरे, राजेश बनसोडे यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. योगेश नावाच्या सुरक्षारक्षकाचा शोध तालुका पोलिस प्रशासन घेत आहेत. मात्र, यातील आरोपीची भाऊ योगेशचा घडलेल्या घटनेशी काही एक संबंध नाही. तो सुरक्षा रक्षक देखील नाही. योगेश हा सीएचपी मेगावॅट या प्लॅन्टमध्ये कार्यरत असून ३ फेब्रुवारी रोजी रात्री तो घरी होता. तरीही त्यास संशयित म्हणून तालुका पोलिसांत बोलावून चौकशीचा उद्देश काय? असा प्रश्‍न बाविस्कर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दीपनगर केंद्रात २ फेब्रुवारी रोजी रात्री पॉवर हाऊसमध्ये अनधिकृत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारे संजय बर्‍हाटे, पीयूष बर्‍हाटे, निखिल बर्‍हाटे यांचा आत जाण्याचा उद्देश काय? याची चौकशी करावी. इतरांना नाहक गोवू नये, अशी मागणी बाविस्कर यांनी केली. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत गाढे, विजय धनगर, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे, आकाश सपकाळे, दीपक लोहार, संतोष गुप्ता उपस्थित होते.

Protected Content