चितेगाव येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चितेगाव येथे तालुकास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यात तालुक्यातील ४० संघांनी सहभाग घेतला तर अंतिम सामन्यात आझाद क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपदी चितेगाव क्रिकेट क्लब संघ तर सनराईज क्रिकेट क्लब (हिरापूर) संघ तृतीय स्थानी राहिला.

सदर स्पर्धेचे आयोजन शिव दांगडो क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील (कोदगाव) यांच्या वतीने प्रथम बक्षीस म्हणून ३१ हजार तर तांबोळा सरपंच निलेश जाधव व पिंप्रीचे माजी उपसरपंच राजेंद्र मोरे यांच्या वतीने २१ हजाराचे द्वितीय तर चितेगावचे माजी सरपंच अमोल भोसले, पिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र राजपूत यांच्या वतीने ११ हजार रुपये तृतीय व चितेगावचे सरपंच प्रभावतीताई गायकवाड यांच्या वतीने ५००० हजार रुपये चतुर्थ पारितोषिक म्हणून देण्यात आले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चितेगाव क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत ८ षटकात प्रतिस्पर्धी संघासमोर ७७ धावांचे आव्हान उभे केले तर आझाद क्रिकेट संघाने चुरशीची लढत देत ६ षटकात सामना जिंकून विजेतेपद पटकावले, मालिकावीर व सामनावीर विकी लोखंडे ठरला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी कैलास कवडे, मनोज भोसले, पंकज देसले, शरद सोनवणे, सर्वेश भोसले यांचे सहकार्य लाभले तर गौतम मोरे, संदीप जाधव, कल्पेश कवडे, मुकेश जाधव, ऋषी देवरे यांनी मेहनत घेतली.

Protected Content