
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।संत मुक्ताईंचे जीवनचरित्र म्हणजे स्त्रीशक्ती, ज्ञान आणि भक्तीचा अद्भुत संगम असून त्यांच्या अलौकिक विचारांतून समता, सहिष्णुता आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश मिळतो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी केले. ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत आयोजित विशेष आध्यात्मिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘संत मुक्ताई : व्यक्तित्व, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करून ज्येष्ठ नागरिकांशी आध्यात्मिक संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील होते. संत मुक्ताईंचे जीवनचरित्र, त्यांचे आध्यात्मिक योगदान, अभंगरचना, वारकरी संप्रदायातील स्थान तसेच खानदेशाशी असलेले ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नाते या विविध पैलूंचा डॉ. पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या अभ्यासपूर्ण निरूपणामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना संत मुक्ताईंच्या विचारविश्वाची ओळख झाली. निरूपणाच्या प्रारंभी डॉ. पाटील यांनी संत मुक्ताई हे केवळ एक नाव नसून ते एक तत्त्वज्ञान आणि ज्ञानाचे विद्यापीठ असल्याचे सांगितले. संत एकनाथ महाराजांनी मुक्ताईंचे वर्णन ‘आदिशक्ती’ आणि ‘जगत्उद्धारासाठी अवतार धारण केलेली शक्ती’ असे केले असल्याचा संदर्भ देत त्यांनी विविध संतांच्या अभंगांच्या आधारे मुक्ताईंच्या श्रेष्ठत्वाचे विवेचन केले.
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई या चार भावंडांच्या अवतारकार्याचा तसेच त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा त्यांनी सविस्तर मागोवा घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही संत मुक्ताईंनी आपल्या ज्ञान, भक्ती आणि विचारांच्या सामर्थ्याने संतपरंपरेत अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होणारी आध्यात्मिक उंची आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आजही समाजाला मार्गदर्शक ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
संत मुक्ताईंच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकताना डॉ. पाटील यांनी ताटीचे अभंग, ज्ञानबोध, ओव्या, कूट अभंग आणि हरिपाठ या साहित्यप्रकारांचा परिचय करून दिला. या साहित्यरचनेतून प्रकट होणारे तत्त्वज्ञान, आत्मज्ञानाचा विचार आणि भक्तिमार्गाचे महत्त्व त्यांनी सोप्या पद्धतीने उलगडून सांगितले. मुक्ताईंच्या विचारांमधून स्त्रीशक्तीचा गौरव, ज्ञानाची महती आणि भक्तीची व्यापकता अनुभवायला मिळते, असेही त्यांनी नमूद केले. समारोपाच्या भाषणात डॉ. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवसंपन्न जीवनाचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ एकत्र येण्याचा मंच नसून ज्ञान, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबरच एकमेकांच्या सुख-दुःखांत सहभागी होण्याचे सकारात्मक व्यासपीठ आहे, असे त्यांनी सांगितले. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी जीवन जगण्यासाठी संतविचार आणि नामस्मरण यांची साथ महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. नि. तु. पाटील यांच्या संयोजनानुसार कार्यरत असलेल्या संघाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी संघाचे सचिव सतीश जंगले, उपाध्यक्ष भानुदास पाटील, सहसचिव संजीव चौधरी, आर. डी. पाटील, गणेश सरोदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, रमेश पाटील, नेमिनाथ राणे, नरेंद्र नेमाडे आणि ज्योती माळी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तुकाराम पाटील, भास्कर खाचने, लोटू फिरके, शोभा फिरके, लता जंगले, दिवाकर गुळवे, मंगल कोळी, दिलीप मराठे, अनिल नारखेडे, अशोक नेहते, सुरेश नेहते, तुळशीराम नेहते, दिलीपसिंग पाटील, पंडित पाटील, हरी नाटो पाटील, अनिल विक्रम पाटील, पांडुरंग पाटील, विकास मनोहर राणे, नेमीचंद राणे, प्रकाश फालक, मोहन साळुंखे, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, लीलावती वाणी, राजेंद्र जावळे, शरद पाटील, विजया पाटील, निळू पाटील आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



