जळगाव, प्रतिनिधी | शिखर बँकेत घोटाळा झाल्याप्रकरणी ईडीने फक्त गुन्हा दाखल केला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकरण आमच्याच मुख्यमंत्र्यांनी काढले होते. यात राजकारण काहीच नाही आहे, आता गुन्हा नोंद झाला आहे. त्याची चौकशी करून मग कारवाई होईल. मी कोणाचा रूपयाही घेतलेला नाही, वाटल्यास पालकमंत्र्यांना विचारावे, अशी स्पष्ट भूमिका माजी खा.ईश्वरलाल जैन यांनी आज (दि.२५) पत्रकारांशी बोलतांना मांडली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे गुन्हे दाखल झाले आहेत. फक्त फरक एवढाच आहे की, पोलिस गुन्हा दाखल करतील, त्यानंतर चौकशी करून एसआयटीची स्थापना होवून ते चौकशी करून पुढील कारवाई करतील, यावेळी मात्र तसे न करता, ईडीने गुन्हा दाखल केला असून तेच चौकशी करणार आहेत. त्यांना माझे १०० टक्के सहकार्य असेल, मी जेडीसीसी बँकेच्या वतीने या शिखर बँकेवर संचालक होतो. मी ज्याही बैठकांना उपस्थित राहिलो आहे. त्याचे भत्ते किंवा गाडी, रेस्टहाऊस याचासुध्दा वापर केलेला नाही. मी कुठलाही लोभ न ठेवता समाज कार्याच्या उद्देशाने काम करित होतो. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. बोर्डासमोर एखादा विषय आल्यास त्यांना मजुरी देणे किंवा न देणे एवढेच आमच्या हातात असते, मात्र त्याची कागदपत्रे तपासणी, रिपोट फाईल बनविणे ही सर्व काम अधिकारी करित असतात.
याप्रकरणाची चौकशी आमच्याच मुख्यमत्र्यांनी सुरू केली होती, त्यावेळी एटीएसने माझ्यावरही ठपका ठेवला होता. तेव्हा शरद पवार यांचे नाव कुठेही नव्हते, मात्र आता कसे आले ? माहित नाही. माझ्यावर २५ ते ३० लाखांची जबाबदारी टाकली आहे. उच्च न्यायालयाचा आदेश मला शिरसावंद्य आहे. मी जरी सक्रीय राजकारणातुन निवृत्त झालो असलो, तरी मी पक्षासाठी काम करीत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.