मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांची बदनामी करणारे व्हिडीओ अनिल थत्ते यांनी हटवावेत असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे गिरीशभाऊ महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कथित मुक्त पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या गगनभेदी या युट्युब चॅनलवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यावर गंभीर आरोप करणारा व्हिडीओ अपलोड केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यात थत्ते यांनी महाजन यांचे राज्यातील एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडल्या होत्या. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी यावरून महाजन यांच्यावर टिका केली होती. तर गिरीशभाऊंनी त्यांना प्रत्युत्तर देतांना खडसेंवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, या प्रकरणी गिरीशभाऊ महाजन हे न्यायालयात गेले होते. त्यांनी याबाबत अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांना नोटीस दिली होती. यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने अनिल थत्ते यांनी सोशल मीडियातून सदर व्हिडीओ काढून टाकावा असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीशभाऊ महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, आता अब्रू नुकसानीच्या खटल्यात पुढे काय होणार ? याची उत्सुकता लागली आहे.