मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरची युध्दजन्य स्थिती लक्षात घेता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी आपला यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ना. रक्षाताई खडसे यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक १३ मे रोजी असून यंदा त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यानिमित्त जारी केलेल्या निवेदनात त्यांनी दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिक शहीद झाले असून यानंतर सीमेवर तणाव असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे नमूद केले आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली येथे राहणार असून कोणाच्याही शुभेच्छा स्वीकारणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. तर, आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता शुभेच्छा जाहिराती देऊ नयेत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दरवर्षी रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तथापि, आता त्यांनी स्वत: वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केल्यामुळे यंदा कोणतेच कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.