‘आसेमं’ आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

0
7

सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे प्रभाकर बुला महाजन बहुउद्देशीय सभागृहात दिनांक ११ मे रोजी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित अविरत २८ वा तडवी-भिल समाज सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये दहा वधू-वरांनी रेशीमगाठ बांधत नवजीवनाला सुरुवात केली.

या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीत सावदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, मुंबईचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी राजू अमीर तडवी, सेवानिवृत्त डिवायएसपी रशीद तडवी, पीएसआय अमोल गर्जे, डायमंड शाळेचे अध्यक्ष डॉ. शेख हारुन आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

विवाह विधी मौलवींच्या उपस्थितीत धार्मिक पद्धतीने पार पडले. माध्यमिक शिक्षक गनी बिस्मिल्ला तडवी यांच्या तर्फे प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी भांड्यांचा सेट, उद्योजक आझाद हैदर तडवी (नाशिक) यांच्याकडून कुकर सेट, तर सरपंच रज्जाक तडवी यांच्याकडून घड्याळ भेट स्वरूपात देण्यात आले.

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजवर या समाजात १८४० जोडप्यांचे विवाह आसेमंच्या माध्यमातून लावण्यात आले असून, आजच्या दहा जोड्यांसह हा आकडा १८५० वर पोहोचला आहे, ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.

सपोनि विशाल पाटील यांनी सामूहिक विवाहसोहळ्यांचे सामाजिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी शिक्षण व सुसंस्कारांकडे वळावे असे आवाहन केले.

आसेमं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी यांनी सांगितले की, सामूहिक विवाह सोहळा मागील २७ वर्षांपासून अविरत आणि निस्वार्थ सुरु असून कोणतीही देणगी न घेता समाजाच्या प्रेमातून हा उपक्रम यशस्वी होतो आहे. कार्यक्रमाच्या समारोपावेळी आदिवासी क्रांतिकारक तंट्यामामा भील व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला वंदन करून आदिवासी गीतांवर परंपरागत नृत्य सादर करण्यात आले.

या सोहळ्याचे आयोजन राजु बिर्हाम तडवी, मुबारक अलीखा तडवी, कामील नामदार तडवी, इरफान तडवी, अनिल नजीर तडवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. महावितरण व महसूल प्रशासनातील हनिफ तडवी यांचा सेवानिवृत्ती सत्कार यावेळी करण्यात आला.

पोलीस विभागाचे निलेश बाविस्कर, अफजल तडवी, मयूर पाटील, समीर तडवी, मनोज तडवी तसेच अनेक आदिवासी कार्यकर्ते व सेवाभावी व्यक्तींनी समर्पित सहभाग घेत सोहळा यशस्वीतेकडे नेला.

हा आदिवासी समाजासाठी एक प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रम ठरला असून, समाजात विवाह संस्कारांचे मूळ स्वरूप कायम राखण्याचा आसेमं संस्थेचा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद आहे.