कन्हेरगडाच्या मार्गातील कोरीव पायऱ्या पर्यटकांसाठी खुल्या ; सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

kanher fort

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील पाटणादेवी अरण्यातील कन्हेरगडावर जाण्यासाठी असलेल्या वाटेतील अत्यंत अवघड अशा उभ्या कातळ कड्यावर जवळपास 70 कोरीव पायऱ्या नुकत्याच तयार करण्यात आल्या होत्या. या पायऱ्यांचे पूजन त्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

 

14 एप्रिल रविवार रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रथम पाटणा गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार व सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध विभागांच्या शिलेदारांचा सहभाग होता. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ही पालखी मिरवणूक पाटणादेवी अभयारण्यात शिरण्यापूर्वी असलेल्या गेट जवळील अभिजीत शितोळे यांच्या शेतात उभारलेल्या मंडपात नेऊन त्या ठिकाणी शाहीर वैभव घरात यांचा बहारदार पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.

 

यावेळी मान्यवरांचा सह्याद्री प्रतिष्ठानच्या विविध कामांची फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष रमेश आबा चव्हाण युगंधरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्मिता बच्छाव, जिजाऊ जयंती समितीच्या अध्यक्षा सोनलताई साळुंखे, भीमराव नाना खलाने, पाटण्याचे माजी सरपंच अभिजीत शितोळे, सरपंच केशव पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर अभिजीत शितोळे यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन सह्याद्रीच्या शिलेदारांनी कन्हेरगड चढाईस सुरुवात केली.

 

रणरणत्या उन्हात सह्याद्री प्रतिष्ठानच्या महिला रणरागिणींच्या हस्ते या पायऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, अशा घोषणांनी संपूर्ण कन्हेरगडाचा आसमंत निनादला होता. पाटणा येथील कार्यक्रमात सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीप घोरपडे यांनी केले. यावेळी वनविभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचेही प्रतिष्ठानला सहकार्य लाभले.

Add Comment

Protected Content