तीन-चार महिन्यात मिळणार कोरोनावरील लस- हर्षवर्धन

नवी दिल्ली । कोरोनाच्या नवीन लाटेची धास्ती असतांनाच येत्या तीन-चार महिन्यांमध्ये याची लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पुढच्या लाटेची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने आता याची लस कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यातच आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महत्वाची घोषणा केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. तसेच, जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास २५-३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो शेतकर्‍यांना कोविडचे नियम पाळण्याची विनंती डॉ. हर्षवर्धन यांनी केली. याबाबत आवाहन करतांना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, माझी सर्वांना विनंती आहे की आंदोलकांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत. त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.

Protected Content