काही जण शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत – पंतप्रधान

वाराणसी वृत्तसंस्था । नवीन कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असले तरी काही जण शेतकर्‍यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

दिल्लीच्या वेशीवर सुरू असणारे शेतकर्‍यांचं आंदोलन चिघळले असून हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यावर अद्यापही तोडगा निघालेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाराणसी दौर्‍यादरम्यान भाष्य केलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. गैरसमज निर्माण केले जात आहेत. ज्यांनी आतापर्यंत शेतकर्‍यांचा छळ केला, ते आता शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. सरकारं कायदे तयार करतात. काही प्रश्‍न स्वाभाविक आहेत. तो लोकशाहीचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा. पण आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी भीती निर्माण केली जाते. तर, नव्या कायद्यामुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय मिळतील, असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, याआधी पिकांसाठी हमीभाव असूनही खरेदी कमी व्हायची. शेतकर्‍यांच्या नावाखाली कर्जमाफी माफी व्हायची. पण ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचायची नाही. नव्या कृषी कायद्यांत जुन्या पद्धतीला रोखणारी कोणतीही तरतूद नाही. आधी बाजाराबाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर होता. अशा परिस्थितीत छोट्या शेतकर्‍यांची फसवणूक व्हायची. आता लहान शेतकरीसुद्धा बाजारबाहेर झालेल्या व्यवहाराविरोधात कायदेशीर पावलं उचलू शकतो. शेतकर्‍यांना आता नवे पर्याय खुले झाले असून त्यांना फसवणुकीपासून कायद्यांचं संरक्षण मिळाले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी याप्रसंगी केले.

Protected Content