कोरोनामातेचे मंदिर पाडले !

 

लखनौ : वृत्तसंस्था । कोरोनाला पिटाळून लावण्याच्या मागणीसाठी उभारलेलं उत्तरप्रदेशातलं कोरोना माता मंदिर पाडण्यात आलं आहे.

 

ग्रामस्थ्यांनी पोलिसांवर मंदिर पाडल्याचे आरोप केले आहेत. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, हे मंदिर वादात अडकलेल्या जागेवर उभं होतं. त्यामुळे या वादात सहभागी असलेल्यांपैकीच कोणीतरी हे मंदिर पाडलं आहे.

 

गावकऱ्यांनी सांगितलं की, हे मंदिर लोकवर्गणीतून लोकेश कुमार श्रीवास्तव यांनी पाच दिवसांपूर्वीच उभारलं होतं. त्याचबरोबर या मंदिरात कोरोना माते”ची प्रतिष्ठापनाही करण्यात आली होती. त्यासाठी गावातले राधेश्याम वर्मा यांची पुजारी म्हणून नेमणूकही करण्यात आली होती.

 

नोएडामध्ये राहणारे लोकेश यांच्यासोबतच नागेश कुमार श्रीवास्तव आणि जयप्रकाश श्रीवास्तव यांच्या मालकीची ही जमीन आहे. या मंदिराच्या उभारणीनंतर लोकेश यांनी गाव सोडलं आणि नोएडाला परतले.

 

नागेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे मंदिर फक्त जमीन लाटण्यासाठी बांधण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधल्या शुक्लपूर गावातला हा प्रकार आहे.

 

गावातल्या एका मोठ्याशा कडुलिंबाच्या झाडाखाली  मंदिर होतं. या मंदिरात   मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तीला मास्क देखील घातलेला होता. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर करोनाबाबतचे सर्वात महत्त्वाचे उपाय दिलेले होते. यामध्ये मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं होतं.  दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत  सर्व नियम पाळूनच उभे राहतात.

 

Protected Content