पद्मनाभ मंदिरातील १० पुजारी कोरोनाग्रस्त

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था । केरळमधील तिरुवनंतरपुरमच्या पद्मनाथस्वामी मंदिरातील १० पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत . नंतर मंदिरात १५ ऑक्टोबरपर्यंत दर्शन रोखण्यात आलं. दोन मुख्य पुजारी, आठ सहकारी पुजारी आणि दोन गार्ड कोविड १९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दर्शनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाविकांना मंदिरात दाखल होण्यास परवानगी नसली तरी दररोजची पूजा मात्र नित्यनेमाने सुरूच राहील. लॉकडाऊनमध्ये देशातील सर्व धार्मिक स्थळं बंद करण्यात आली होती. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात काही अटी आणि नियमांसहीत मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पद्मनाथस्वामी मंदिरही २६ ऑगस्टपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं.

भाविकांसाठी कोविड १९ चे कडक नियम लागू करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांना एक दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. दर्शनासाठी येताना आधार कार्ड आणि ऑनलाईन बुकिंगची एक प्रत सोबत बाळगण्यास सांगण्यात आलं होतं. .

एका वेळी केवळ ३५ भाविकांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. एका दिवसात केवळ ६६५ भाविकांना दर्शन करता येत होतं. भाविकांना मास्क परिधान करणे, साबणानं हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात देशभरात आणखीही काही मंदिरं भाविकांसाठी उघडण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीचं स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरही १३ ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. सीमित संख्येलाच दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. वृंदावनचं प्रसिद्ध बांकेबिहारी मंदिरही १७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी उघडलं जाणार आहे.

Protected Content