दुर्गा पूजा मंडपाला भीषण आग : भाविक होरपळले

वाराणसी-वृत्तसंस्था | उत्तर प्रदेशात दुर्गा पूजा मंडपाला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये नवरात्रीत काल रात्री दुर्गापूजा मंडपात भीषण आग लागली असून यात सुमारे ६४ भाविक होरपळले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे म्हटले जात आहे. मंडपाला आग लागली तेव्हा जवळपास दीडशे लोक उपस्थित होते. आग एवढी भीषण होती की, त्यात ६४ जण भाजले. याशिवाय तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, यावेळी ४० टक्क्यांहून अधिक लोक आगीत अडकले. यामध्ये बहुतांश लोक ३० ते ४० टक्के भाजले आहेत. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अग्नीशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. तर पोलीस प्रशासनाने धाव घेऊन येथील रूग्णांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी मदत केली. वरिष्ठ अधिकारी स्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती उत्तर प्रदेश प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सीएमओनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, भदोही जिल्ह्यातील औरई येथील दुर्गा पंडालला लागलेल्या आगीच्या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

Protected Content