एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन लाखो रुपये हडपणारी टोळी पकडली , ७४ एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्त

 

 

बीड : वृत्तसंस्था ।  क्लोनिंग केलेले  एटीएम कार्ड वापरून  बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बीड पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे.

बीड पोलिसांनी पाळत ठेऊन सापळा रचून शिर्डीतून चार भामट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार्ड क्लोन करण्यासाठीची उपकरणांसह ७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

 

बीड येथील नागरिक भीमराव पायाळ यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तींनी ८०  हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा शिवाजीनगर ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास बीडच्या सायबर सेलकडे सोपविण्यात आला. सायबर सेलने केलेल्या तपासात बिहारच्या गुन्हेगारांनी  रक्कम एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन मुंबईतील एटीएममधून काढल्याचे निष्पन्न झाले.

 

 

पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करुन बीडमधील सर्व लॉजचे रेकॉर्ड तपासले. त्यावेळी एका लॉजमध्ये थांबलेल्या काही व्यक्तींचे ए टी एम जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्यांशी साम्य दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पत्ता काढून त्यांच्यावर पाळत ठेवली. दरम्यान, हे बिहारी ठग शिर्डीला येणार असल्याची गुप्त माहिती बीड पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी शिर्डीत सापळा रचून बिरु राजेंद्र पांडे, सतीशकुमार नंदलाल प्रसाद, मोहम्मद असद नसीम खान आणि मोहम्मद जावेद जब्बार खान या चार चोरट्यांना ताब्यात घेतले.

 

मुख्य आरोपी बिरु राजेंद्र पांडे हा मुखिया आहे. गुगल आणि युट्यूबच्या माध्यमातून याने ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविले. एका एटीएम माशीनमधून एक यंत्र चोरुन त्याचा क्लोन तयार केला. ज्या ठिकाणी कमी वर्दळ आणि पैसे जास्त असल्याचे एटीएम हेरुन हे चौघे काम करायचे. ग्राहक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर यातील एक जण ग्राहक बनून एटीएम मध्ये थांबायचा आणि ग्राहकांचा पासवर्ड लक्षात ठेवून तो साथीदारांना मेसेज करायचा त्या एटीएमचा डमी क्लोन तयार करुन राज्यातील विविध एटीएममधून पैसे काढायचे.

 

पोलिसांनी पाळत ठेवून या चारही आरोपींच्या शिर्डी येथून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी  त्यांच्याकडून स्किनर (एटीएम कार्ड क्लोनिंग डिव्हाईस),  ७४ एटीएम कार्ड, १० मोबाईल, चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांचे मुंबई-पुणे आणि मराठवाड्यात जाळे असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी वर्ताविली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Protected Content