बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याचा दावा

balakot air strike pak

रोम (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकबाबत इटलीच्या एका महिला पत्रकाराने मोठा दावा केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार या एअर स्ट्राइकमध्ये कमीत कमी १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यातील सुमारे ४५ जखमी दहशतवाद्यांवर पाकिस्तानातील रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू असल्याचा दावाही या पत्रकार फ्रँसेसा मॅरिनो हिने केला आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा बालाकोट एअर स्ट्राइकचा मुद्दा चर्चेत आला आहे.

 

या पत्रकार महिलेने ‘स्ट्रिंगरेशिया’ (STRINGERASIA.IT) या संकेतस्थळावर एक वृत्तांत छापून त्यात या हल्ल्याची विस्तृत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने पहाटे ३.३० वाजता बालाकोटवर हल्ला केला. माझ्या माहितीप्रमाणे शिंकयारी आर्मी कँम्पवरून लष्कराची तुकडी घटनास्थळी पोहोचली. लष्कराची तुकडी हल्ल्याच्या दिवशी पहाटे ६ वाजता घटनास्थळी पोहोचली होती. शिंकयारी बालाकोटपासून २० किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा पाकिस्तानी आर्मीचा बेस कँम्पही आहे. या ठिकाणी पाकिस्तानची ज्यूनियर लीडर्स अकादमी सुद्धा आहे. आर्मीची तुकडी बालाकोटला पोहोचल्यानंतर तिथून अनेक जखमींना पाकिस्तानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या मते अद्यापही पाकिस्तानच्या रुग्णालयात ४५ लोकांवर उपचार सुरू आहेत. उपचारावेळी २० लोकांचा मृत्यू झाल्याचंही मॅरिनोने म्हटले आहे.

उपचारानंतर डिस्चार्ज झालेल्या लोकांना पाकिस्तानी आर्मीने त्यांच्या कोठडीत ठेवले आहे. अनेक दिवस माहिती घेतल्यानंतर माझ्या सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या १३० ते १७० पर्यंत असू शकते. यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचाही समावेश असल्याचा दावाही मॅरिनोने केला आहे. जे अतिरेकी मारले गेले आहेत, त्यात ११ प्रशिक्षकांचाही समावेश आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती लिक होऊ नये, म्हणून ‘जैश’ने विशेष तयारी केली आहे. मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना ‘जैश’ने नुकसान भरपाई दिल्याचेही मॅरिनो यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content