विविध मागण्यांसाठी पाचोर्‍यात उद्या कॉंग्रेसचा ‘दणका मोर्चा’

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांचे निराकरण करण्यात यावे या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे उद्या शहरात भव्य दणका मोर्चा काढण्यात येणार आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसह पाचोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत पाचोरा कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अनुषंगाने प्रशासनास जागे करण्यासाठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली १९ जुन रोजी सकाळी १० वाजता शहरातील मच्छी बाजार पासुन ते थेट प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत भव्य स्वरुपाचा दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी व शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिन सोमवंशी यांनी केले आहे.

शेतकर्‍यांच्या कापसाला भाव देऊन शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, पाचोरा व भडगांव तालुक्यातील उच्च तापमानात केळी / मोसंबी आदी फळ झाडाचे नुकसान भरपाई तात्काळ द्या, पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात महावितरण विज कंपनीच्या मनमानी कारभाराने ईलेक्ट्रीक पोलवर मिटर बसवण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, बाहेरपुरा भागातील भुयारी गटारीचे अपुर्ण काम त्वरीत करण्यात यावे, बाहेरपुरा भागात असलेली हिंदु स्मशान भुमीच्या लगत असलेला भुखंड तात्काळ पेव्हर ब्लॉक बसवुन पार्किंगसाठी देण्यात यावा, नेरी ता. पाचोरा येथील शेतकर्‍यांसाठी फरशीचे काम तात्काळ करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, यासोबत पुरवठा विभागातील प्रलंबीत लाभार्थीना तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा, ऑक्टोंबर – २०२२ ते मार्च – २०२३ मोफत धान्य व विकत धान्यांची चैकशी करण्या यावी या देखील मोर्चेकर्‍यांच्या मागण्या आहेत. या अनुषंगाने कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मच्छी बाजार ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दणका मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच पाचोरा शहर व तालुक्यातील ज्यांना नविन रेशन कार्ड व धान्य मिळत नसेल त्यांनी आपले कागदपत्रे घेऊन मोर्चात सामील व्हा. असे आवाहन पाचोरा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड. अमजद पठाण यांनी केले आहे.

Protected Content