जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई द्यावी – आ. चव्हाणांची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या ५ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यावर आभाळ प्रकोपाचे सावट अधिक गडद झाले आहे. यामुळे तालुक्यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मंगळवारी दि.२८ रोजी पहाटे पाच वाजता तितूर व डोंगरी नदीला पाचव्यांदा पुर आला असून दुकानांमध्ये पाणी घुसले. ढगफुटी सदृश्य पाऊस व गुलाब चक्रीवादळाचा मोठा तडाखा  तालुक्याला बसत असून गत २४ तासात ४४५ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे उरल्या – सुरल्या खरीप पिकांचा चिखल झाला आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतक-यांच्या डोळ्यातूनही अश्रूंचा पूरच वाहू लागला आहे. तालुक्यात मंगळवार अखेर ११०२.१३ पर्जन्यमान झाले आहे. सातही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अश्या संकटाचा काळात बळीराजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून चाळीसगाव तालुक्यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजयजी वडेट्टीवार यांच्यासह जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र देऊन चाळीसगाव तालुक्यातील भयावह परिस्थितीची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे. पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह पाचोरा, भडगाव जि. जळगाव व कन्नड तालुका जि.औरंगाबाद, नांदगाव तालुका जि.नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीची व शेती पिकांची हानी झाली होती. हजारो हेक्टर जमीनी आलेल्या महापुरात खरडून गेल्या. चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावांना शेतामध्ये पाणी तुंबून हातातोंडाशी आलेले कपाशी, ऊस, मका, ज्वारी – बाजरी आदी सर्वच पिके खराब झाली आहेत.  आधीच कापसावर लाल्यारोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यात गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाची पूर्णपणे नासाडी होत आहे. या अगोदरच उशिराने झालेले वरूण राजाचे आगमन, सारखी पावसाची रिप-रिप, मुसळधार पावसासह वादळ, कोरोना काळ यामुळे बळीराजा चारही बाजूंनी होरपळला गेलेला आहे. तसेच कापसासह ज्वारी व मका या पिकांवर देखील अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

Protected Content