मुक्ताईनगरात दररोज म्हटले जाते सामूहिक राष्ट्रगीत; पाच वर्षांपासून उपक्रम सुरू ! ( व्हिडीओ )

मुक्ताईनगर पंकज कपले | येथील प्रवर्तन चौकात दररोज सकाळी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम अव्याहतपणे राबविण्यात येत आहे. आज या अनोख्या उपक्रमाला पाच वर्षे होत असून अशा प्रकारचे राष्ट्रगान म्हणणारे मुक्ताईनगर हे देशातील दुसरे शहर ठरले आहे.

मुख्य प्रशासकीय कार्यालये वगळता सहसा स्वातंत्र्य दिन वा प्रजासत्ताक दिन वगळता कुठे ध्वजारोहण वा सामूहिक राष्ट्रगीत गायन होत नाही. मात्र येथील प्रवर्तन चौकात गेल्या पाच वर्षांपासून दररोज अव्याहतपणे सकाळी आठ वाजता सर्व मिळून राष्ट्रगीत म्हणत असतात. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे मुक्ताईनगर हे देशातील दुसरे शहर असून यामुळे शहराला नावलौकीक मिळाला आहे.

मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून प्रवर्तन चौकाची ख्यात आहे. याच चौकातील एका उपक्रमाने मुक्ताईनगर शहराला नावलौकीक मिळवून दिला आहे. मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी, वंदे मातरम ग्रुप, गजानन गणेश मंडळ आणि ओम साई सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून येथील प्रवर्तन चौकात दररोज सकाळी आठ वाजता सामूहिकरित्या राष्ट्रगीत म्हटले जाते. १५ ऑगस्ट २०१६ पासून सुरू झालेला हा उपक्रम आजही अव्याहतपणे सुरू आहे. आज हा उपक्रम सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

ऊन, वारा, पाऊस, थंडी आदी कोणत्याही नैसर्गिक अडथळ्यांना न जुमानता शहरातील देशभक्त नागरिकांचा ग्रुप सकाळी आठ वाजता नित्यनेमाने राष्ट्रगीत म्हणण्यासाठी प्रवर्तन चौकात येत असतो. तेलंगणा राज्यातील जम्मीकुंता शहरात दररोज सामूहिक राष्ट्रगीत गायन होत असल्याची माहिती येथील वंदे मातरम ग्रुपच्या सदस्यांना कळली होती. याबाबत पूर्ण माहिती मिळवल्यानंतर याच प्रकारचा उपक्रम आपल्या शहरात देखील राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यातून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर शहरात दररोज सकाळी होणारे हे सामूहिक राष्ट्रगीत गायन नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. यात मोठ्या संख्येने मुक्ताईनगरकर सहभागी होत असतात. अगदी येथून ये-जा करणारे देखील राष्ट्रगान सुरू झाल्यानंतर जागीच थांबून झेंड्याला सलामी देतात. या उपक्रमामुळे परिसरात ज्वाज्वल्य देशभक्तीची भावना निर्माण झाली असून मुक्ताईनगर शहराला नवीन ओळख मिळाली आहे.

दरम्यान, या उपक्रमात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी मोठा कार्यक्रम होत असतो. यानुसार आज वाढीव जनसमुदायाच्या साक्षीने ध्वजारोहण करण्यात आले. आजच मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीने ५० वृक्षांचे रोपण करून ते जगविण्याचा संकल्प देखील केला आहे. अशा प्रकारे मुक्ताईनगरातील हा अनोखा उपक्रम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

खालील व्हिडीओजमध्ये पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत.

फेसबुक व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/508992935887325/videos/2940225972885513

युट्युब व्हिडीओ लिंक

Protected Content