मृत्यूमुखी पडलेल्या गुरांचा पंचनामा झाला, मात्र शासनाकडून मदत नाहीच- डॉ. विवेक सोनवणे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सातोड येथील श्रीमती कमलबाई रामचंद्र मुंढे यांचे २ वर्षांपूर्वी वीज कोसळून एक बैल व एक गोऱ्हा मृत्युमुखी पडला होता तसा जाब जबाब पंचनामा शासनाकडे सादर होऊन २ वर्ष उलटले, परंतु शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब ची प्रचिती शेतकऱ्यांना वारंवार येत असल्याचे स्वाभिमानीचे डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून एक बैल व एक गोऱ्हा असे पशुधन त्यांच्या गट क्रमांक २०० मधील झोपडीजवळ मृत्युमुखी पडले होते. तसा तात्काळ पंचानामा तलाठ्यांनी करून तसा अहवाल जिल्हाधिकारी टंचाई शाखा यांच्याकडे सुपूर्त केला होता. परंतु सदर दुर्घटनेला जवळपास दोन वर्ष उलटूनही सदर पीडित शेतकऱ्यांना कोणती मदत आजतागायत मिळाली नाही. सदर शेतकरी वारंवार राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झिंजवत आहे. राजकीय नेते आज मदत मिळेल, उद्या मदत मिळेल असे गाजर दाखवून पीडित शेतकऱ्याला फिरवत आहेत. सदर शेतकरी हा कोरडवाहू अल्पभूधारक असल्यामुळे त्याला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या पशु धनाची मदत पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या हंगामात पेरणीसाठी उपयोगात पडेल, अशी अपेक्षा होती. परंतु निगरगठ्ठ प्रशासन व उदासीन राजकीय धोरणामुळे सदर पीडित शेतकरी मागील एक वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे. पीडित शेतकऱ्याला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची मदत तात्काळ न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.

Protected Content