मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कचरा संकलनाची गाडी न आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात घरांसमोर कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरातील रस्त्यांवर आणि घरांसमोर कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून “कचरा गाडी नियमित येते” असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीसह डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.




