Home Cities पारोळा विद्यार्थ्यांवरील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ ‘वंचित’ची पारोळा बंदची हाक !

विद्यार्थ्यांवरील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ ‘वंचित’ची पारोळा बंदची हाक !

0
7

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पारोळा येथे बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा तहसीलदारांना निवेदन देत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.

निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेली कथित अमानुष मारहाण आणि पोलिसांची कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, त्यानुसार पारोळा शहरातही शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संघटनेने निवेदनात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांवरील कथित हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच परीक्षांमधील पेपरफुटी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound