आता हेच बाकी होते ! : धोनी व रोहितच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी

कोल्हापूर । क्रिकेटप्रेम हे वेडाच्या स्तरावर गेले तर काय होते याचे उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथे घडले आहे. येथे चक्क धोनी व रोहित यांच्या चाहत्यांमधील वाद हा हाणामारीवर गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

टिम इंडियाचा माजी कर्णधार तर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या पार्श्‍वभूमीवर कुरूंदवाड येथे धोनीच्या काही चाहत्यांनी डिजिटल फलक लावून त्याचे आभार मानले होते.

यानंतर भारतीय संघाचा सलामीवर तथा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या चाहत्यांनीही कुरुंदवाडीमध्ये डिजिटल फलक लावले. त्यामुळे कुरुंदवाडीत एमएस धोनी विरुद्ध रोहित शर्मा असे कोल्ड वॉर सुरु झाले होते. अशातच एका चाहत्याने विरोधी गटाच्या डिजिटल फलकावर ब्लेड मारला. यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. होर्डींग्ज फाडाफाडी केल्याचा कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणार्‍या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिला. सध्या तरी याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली नसली तरी दोन्ही बाजूच्या चाहत्यांमध्ये धुसफुस असल्याने पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Protected Content