
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमधील अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद २०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पराभव झाला असून, अंतिम फेरीत केरळ आणि पश्चिम बंगाल यांच्यात विजेतेपदासाठी थरारक लढत रंगणार आहे. महाराष्ट्राने दमदार फलंदाजी करूनही गोलंदाजीत कमकुवतपणा दाखवत सामना गमावला.
पहिल्या उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालने तामिळनाडूवर केवळ एका विकेटने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. सामन्यात पश्चिम बंगालने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १११ धावा केल्या. प्रत्युत्तरात तामिळनाडूने २० षटकांत ७ गडी गमावत केवळ १०८ धावा केल्या. अवघ्या ३ धावांनी पराभूत झाल्याने तामिळनाडूचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. सलामीवीर शारव शहा आणि आदर्श गव्हाणे यांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघासाठी मजबूत पाया रचला. शारव शहा ४६ तर आदर्श गव्हाणे ४८ धावा करून बाद झाले. उर्वरित फलंदाजांनीही योगदान देत संघाचा स्कोअर २० षटकांत १६५ पर्यंत नेला. केरळने मात्र हे लक्ष्य १९.३ षटकांत गाठून सामना सहज जिंकला. केरळच्या सलामीवीरांनी आक्रमक खेळी करत विजयाची मजबूत पायाभरणी केली आणि नंतर मधल्या फळीनेही उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं.
त्यानंतर अभंग जैन यांच्या हस्ते सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसे वितरित करण्यात आली. याच दिवशी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यांमध्ये उत्तराखंडने युएईवर दणदणीत विजय मिळवला. युएईने प्रथम फलंदाजी करत केवळ ५४ धावा केल्या होत्या, ज्याला उत्तराखंडने अवघ्या ४.५ षटकांत गाठत दहा गडी राखून विजय मिळवला.
महाराष्ट्राच्या संघाने याच दिवशी आंध्र प्रदेशवर विजय मिळवत आपल्या सामन्याची अखेर गोड केली. शारव शहा, आदर्श गव्हाणे आणि आदी लोंगणी यांच्या फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने १३४ धावा केल्या. प्रतिसादात आंध्र प्रदेश केवळ ९८ धावाच करू शकला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक तन्वीर अहमद, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



