
पाटणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । कधी काळी बिहारच्या रस्त्यांवर गुन्हेगारांना धडा शिकवणारा ‘सिंघम’ आता मतदारसंघात न्यायासाठी झुंज देणार आहे. माजी आयपीएस अधिकारी आणि आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश करताच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दोन ठिकाणांहून अपक्ष उमेदवार म्हणून उतरायची घोषणा केली आहे. जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांतून ते निवडणूक लढवणार असून, जनतेच्या सेवेसाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील असले तरी त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या नात्याने बिहारमध्ये दीर्घ काळ सेवा केली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी, माफिया आणि भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई केल्यामुळे त्यांना ‘सुपर कॉप’ आणि ‘सिंघम’ अशी ओळख मिळाली होती. या जनमानसातील लोकप्रियतेला आता ते राजकारणात लोकसेवेसाठी उपयोगात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या पोलिसी वर्दीला अलविदा करत राजीनामा दिला आणि लोकांच्या थेट संपर्कात राहण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
लांडे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘हिंद सेना पार्टी’ नावाने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. मात्र, पक्षाची अधिकृत नोंदणी निवडणूक आयोगाकडे वेळेत न झाल्यामुळे सध्या त्यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागत आहे. त्यांना अनेक मोठ्या राजकीय पक्षांकडून तिकीट देण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाशी संधीच्या राजकारणासाठी हातमिळवणी करण्याऐवजी स्वाभिमानाने अपक्ष म्हणून लढण्याचा मार्ग निवडला.
लांडे यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या राजकारणाचा मुख्य उद्देश म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात लढा आणि जनतेसाठी पारदर्शक प्रशासन. त्यांनी ज्या भागात काम केलं, त्या भागात आजही मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रचंड मागासलेपण आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. जमालपूर आणि अररिया हे दोन्ही भाग त्यांच्या सेवाकाळाशी निगडीत असून, नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी या ठिकाणांची निवड केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अपक्ष उमेदवार असूनही लांडे यांची प्रतिमा, लोकप्रियता आणि त्यांचं स्वच्छ व सडेतोड व्यक्तिमत्त्व त्यांना निवडणुकीत चांगलं स्थान मिळवून देऊ शकते. त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे बिहार विधानसभा निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. शिवदीप लांडे यांच्या या निर्णायक पावलाकडे संपूर्ण बिहारच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचंही लक्ष लागलेलं आहे.



