चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाकाकडे थकबाकी प्रलंबीत असणार्या शेतकर्यांना ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याची माहिती बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी या संदर्भातील बैठकीत दिली.
चोसाकाकडे २०१४-१५ च्या हंगामातील ६०० रुपये प्रतिटनाप्रमाणे, तीन हजार शेतकर्यांचे सुमारे १३ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. यासंदर्भात रविवारी बाजार समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. याप्रसंगी माजी मंत्री अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, माजी आमदार कैलास पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे व अन्य संचालकसह तसेच कृती समितीचे सदस्य भागवत महाजन आदी उपस्थित होते.
यात याप्रसंगी प्रतिटन थकीत ६०० पैकी ४५० रुपये फेब्रुवारीअखेर आणि उर्वरित १५० रुपये पुढील वर्षाचा हंगाम सपल्यानंतर शेतकर्यांना दिले जातील, अशी माहिती बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी बैठकीत दिली. या निर्णयाचे कृती समितीचे समनव्यक एस.बी.पाटील यांनी स्वागत केले आहे. कृती समितीने न्यायालयात लढा उभारला नसता, तर कदाचित पैसे मिळाले नसते. महिनाअखेर शेतकर्यांची थकीत ७५ टक्के रक्कम मिळणार असल्याने आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एस.बी.पाटील यांनी व्यक्त केली आहे.