मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चीनच्या डीपसीक या कंपनीने आपल्या नवीन “डीपसीक R1” या ओपन एआय चॅटबॉटच्या माध्यमातून जगभरात खळबळ माजवली आहे. अत्यंत कमी खर्चात विकसित झालेल्या या चॅटबॉटमुळे जगभरातील अनेक कंपन्यांनी धास्ती घेतली आहे. विशेषतः अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर बाजारांवर याचा मोठा परिणाम दिसून आला आहे, ज्यामुळे भारतातील काही टेक कंपन्यांचेही शेअर्स गडगडले आहेत.

ओपन एआय सारख्या कंपन्या चॅटजीपीटीसारख्या चॅटबॉटच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. मात्र, डीपसीकने तुलनेने फारच कमी खर्चात DeepSeek R1 चॅटबॉट तयार केला आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञानावर प्रचंड खर्च करणे गरजेचे आहे का, असा प्रश्न गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे एनवीडिया सारख्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स कोसळले असून, या कंपनीला तब्बल 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे.
डीपसीकच्या चॅटबॉटमुळे भारतातील काही प्रमुख टेक कंपन्यांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. गेल्या दोन-तीन सत्रांत काही कंपन्यांचे शेअर्स तब्बल 50% पर्यंत खाली आले आहेत. यामध्ये अनंत राज, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया आणि झेन टेक्नॉलॉजीज या कंपन्यांचा समावेश आहे.
भारतात अनंत राज लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. या कंपनीला लोअर सर्किट लागले असून सध्याचे एका शेअरचे मूल्य 534.45 रुपये आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर 17 टक्क्यांनी घसरून 668.05 रुपयांपर्यंत खाली आले होते. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्यदेखील 10 टक्क्यांनी कमी होऊन 1,460.35 रुपयांवर बंद झाले. सोमवारीदेखील या कंपनीचा शेअर 11 टक्क्यांनी घसरून 1,622.60 रुपयांपर्यंत खाली आला होता.
झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीचा शेअरही मंगळवारी 14 टक्क्यांनी कमी होऊन 1,495.10 रुपयांपर्यंत घसरला. सोमवारी हाच शेअर 1,743.35 रुपयांवर होता. डीपसीकच्या चॅटबॉटच्या यशामुळे गुंतवणूकदारांच्या मनात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. एआय क्षेत्रातील मोठा खर्च आणि त्याचा परतावा यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
डीपसीक R1 च्या यशामुळे एनवीडिया कंपनीला मोठा फटका बसला आहे. एनवीडिया ही कंपनी एआय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना चिप्स पुरवते. मात्र, डीपसीकच्या कमी खर्चातील चॅटबॉटने एआय जगात महागड्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिणामी एनवीडिया चे शेअर्स जवळपास 20% घसरले आहेत.