मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जसप्रीत बुमराहने २०२४ चा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकून भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे. हा सन्मान मिळवणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला असून, त्याच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.

बुमराहने या पुरस्काराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचे जो रूट आणि हॅरी ब्रूक यांना मागे टाकले. मंगळवारी आयसीसीने या प्रतिष्ठित ‘सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार’ची घोषणा केली. विशेष म्हणजे, पाच वर्षांनी हा पुरस्कार एका भारतीय खेळाडूच्या हाती आला आहे. विराट कोहलीने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता.
2024 हे वर्ष बुमराहसाठी विलक्षण ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला. तसेच, T20 विश्वचषकातील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवला गेला. 8 सामन्यांमध्ये 15 विकेट घेत, त्याने फक्त 4.17 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. बुमराहच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे भारताने 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकला.