यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय तरुणांसोबत बालविवाह लावला जात असल्याची गुप्त माहिती यावलच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आटोळे यांना मिळाल्याने प्रकल्प अधिकारी यांनी माहिती मिळताच तात्काळ आपल्या पथकासह दहिगाव येथे जाऊन सदर हा बालविवाह रोखला.
ही कारवाई दिनांक २७ मार्च गुरुवार रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली. व अल्पवयीन मुलीस कायदेशिर कार्यवाही पुर्ण करीत बाल सरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले आहे. दहिगाव या गावात पटेल मोहल्यामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील ( वय १९ ) या तरुणासोबत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात होता. याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी तातडीने दहिगाव हे गाव गाठले आणि या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह रोखला. तर अल्पवयीन मुलगी आणी तरूण व त्याच्या कुटुंबास यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सदर मुलगी ही नागपूर जिल्ह्याची असून मुलीच्या विवाह होत असतांना तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील कोणीच येथे उपस्थित नसल्याचे यावल बाल विकास प्रकल्पाधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगितले आहे. तर कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करीत या अल्पवयीन मुलीस जळगाव येथील बाल सरंक्षण समितीचे बालसंरक्षण अधिकारी प्रतिक जगदीश पाटील व चाईल्ड लाईनचे कुणाल शुक्ला आणी प्रसन्ना बागुल यांच्या पथकाला सोपवण्यात आले.
संबधीत अल्पवयीन मुलीचे पालक बालसंरक्षण अधिकारी यांच्या संपर्कात आल्यावर बालक पालकांना सोपविण्याची पुढील कारवाई करण्यात येईल.