यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील शिवाजी नगर येथील श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सरस्वती विद्या मंदिर, यावल येथे कार्यरत असलेल्या दिपक पाटील यांच्या “छत्रपती शिवाजी राजे, दैवत… आमुचे” या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यापूर्वीही दिपक पाटील यांची विविध साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून, त्यांनी मुंजोबा देवस्थान आणि पद्मालय येथील गणपती यांच्या महतीवर आधारित व्हिडिओ सीडीची निर्मिती केली आहे. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश येवले, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, अरुण कुलकर्णी, भगतसिंग पाटील, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक राकेश कोलते, मनसे नेते चेतन अढळकर यांसह शहर आणि तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित लेखन व पुस्तिका वाचून दिपक पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश येवले आणि श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी आमदार अमोल जावळे, मुकेश येवले आणि दिपक पाटील यांनी उपस्थितांना मनोगत व्यक्त करत प्रेरणादायी विचार मांडले.