महाशिवरात्रीनिमित्त पारोळ्यात निघाली श्री शिवधर्म रक्षा कावड यात्रा


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाशिवरात्रीनिमित्त पारोळा येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे श्री शिवधर्म रक्षा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. यात्रेच्या माध्यमातून पारोळा येथील शिवभक्तांनी श्री क्षेत्र नागेश्वर येथील मंदिरात जलाभिषेक केला.

यंदा या यात्रेचे तिसरे वर्ष असून, जुलूमपुरा परिसरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत. महाशिवरात्रीनिमित्त सकाळी ८ वाजता कावड यात्रेस सुरुवात झाली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत कावड यात्रा पार पडली. यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील उपस्थित होते. त्यांनी स्वतः कावड धरत, महादेवाचा गजर करत भाविकांमध्ये उत्साह वाढवला.

ही यात्रा सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन आझाद चौक, रथ गल्ली, बालाजी मंदिर, पालिका चौक, शिवतीर्थ, उंदीरखेडा रोडमार्गे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर येथे पोहोचली. भाविकांनी पायी प्रवास करत शिव उपासनेत सहभागी होत जलाभिषेक करण्यासाठी जल नेले. या यात्रेच्या माध्यमातून भक्तीभाव व्यक्त करत महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यात्रेचे आयोजन आणि व्यवस्थापन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीने केले. या कार्यक्रमासाठी उबाठा शिवसेनाप्रमुख अशोक मराठे, माजी उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, माजी नगरसेवक अरुण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी, गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभाग घेतला आणि भाविकांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी पाणपोई तसेच विश्रांतीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त पारोळा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने ही यात्रा पार पाडली. मंदिर परिसरात विशेष सजावट करण्यात आली होती. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सजावट, स्वागत कमानी आणि पूजन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेने भक्तिमय वातावरण निर्माण करत धार्मिक उत्सवाला नवा आयाम दिला. पारोळा शहरातील नागरिकांनीही यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेत यात्रेची शोभा वाढवली.