
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे त्यांच्या धगधगत्या राष्ट्रविचारांना आणि असीम त्यागाला अभिवादन करण्यासाठी एका भव्य व्याख्यान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वातंत्र्यप्रेमी’ आणि ‘बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात वक्त्यांनी जळगावकरांशी थेट संवाद साधला.

या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्त्यांनी स्पष्ट केले की, स्वातंत्र्यवीरांचे विचार हे केवळ इतिहासाचे पान नसून, समर्थ आणि स्वाभिमानी भारताच्या निर्मितीसाठीचे आपले नित्य मार्गदर्शक आहेत. अंदमानातील अमानुष छळ सोसूनही ज्यांच्या मनातील देशभक्तीची ज्योत विझली नाही, त्या सावरकरांचे क्रांतीकार्य आणि त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तसेच, “राष्ट्रासाठी आवश्यक ती भूमिका योग्य वेळी जनतेनेही घ्यायला हवी. तशी ती घेतली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. सावरकरांचे विचार ही फक्त ऐकण्याची गोष्ट नसून कृतीत उतरवण्याची गोष्ट आहे,” असे परखड मतही व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आले. या सोहळ्यात स्वातंत्र्यवीरांचे पणतू सात्यकी सावरकर आणि ज्येष्ठ सावरकर अभ्यासक ॲड. सुशील अत्रे यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.
या सोहळ्याला जळगावचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमालाताई काळे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओमजी त्रिवेदी, नितीन पारगावकर, सपान झुंझुनूवाला, राजेश नाईक, सुरेंद्र मिश्रा, संजय व्यास, रेखा त्रिवेदी आणि आकाश त्रिवेदी यांच्यासह अनेक राष्ट्रप्रेमी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगावकरांनी या वैचारिक आणि ऊर्जादायी उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



