
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील बाबा नगर, किल्ला परिसर आणि शिवाजीनगर या भागात वाढती लोकसंख्या लक्षात घेता तातडीने स्वतंत्र नवीन अंगणवाडी सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उबाठा गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महिला बालविकास अधिकारी यांना एक सविस्तर निवेदन सादर केले असून, प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत या तिन्ही परिसरांमध्ये लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, येथे लहान मुलांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, इतकी मोठी लोकसंख्या असूनही या भागात हक्काची स्वतंत्र अंगणवाडी उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना, गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दूर अंतरावर असलेल्या अंगणवाड्यांमध्ये जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
परिसरात अंगणवाडी नसल्यामुळे बालकांचे योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक गरजू लाभार्थी महिला आणि बालके शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याबद्दल सौ. पाटील यांनी तीव्र खंत व्यक्त केली. या तिन्ही भागांत नवीन अंगणवाडी सुरू झाल्यास बालकांच्या शिक्षणाला आणि पोषणाला योग्य दिशा मिळेल, तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



