पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने पाचोऱ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला पाचोरा तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊनच या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकाच छताखाली विविध विभागांचे दालन उपलब्ध करून, नागरिकांना त्यांच्या अडचणी, कर्जाविषयी माहिती, आरोग्य समस्यांचे निराकरण आणि कृषी तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले.
पाचोरा शहराच्या स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवनात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणातून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी व लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्यासह शासनाच्या २० विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२६ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, पी.एम. किसान सन्मान निधी योजना, कृषी विभाग (शेती अवजारे, पाईप, ठिबक सिंचन), विद्युत वितरण विभाग (MSEB), सामाजिक वनीकरण, आपले सरकार सेवा केंद्र/CSC केंद्र, राष्ट्रीयीकृत बँका, RTO विभाग, परिवहन महामंडळ, पोलीस/वाहतूक शाखा, आरोग्य उपाययोजना, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पशु वैद्यकीय विभाग, BSNL विभाग, नगरपालिका प्रशासन आणि सहकार विभाग अशा अनेक महत्त्वाच्या विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. BSNL चे प्रतिनिधी गोकुळ सोनार यांनी विशेषतः नवीन वायफाय फायबर सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली.
या शिबिरात पाचोरा मंडळातील तब्बल ६०० ते ६५० नागरिकांनी उपस्थिती लावली. यामध्ये संजय गांधी योजनेचे ६५ लाभार्थी, आरोग्य तपासणीचा ५७ जणांनी लाभ, २२ जणांना आयुष्यमान कार्डचे वाटप, तर ३५ जणांना नवीन शिधापत्रिकांचे लाभ (एकूण १२३ अर्ज आले) मिळाले. ४५ जिवंत सातबारांचे वाटप, ३५ उत्पन्न दाखल्यांचे वाटप, आणि १२ नॉन क्रिमीलेअर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त, अनेक विभागांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. एकूण एकंदर ६२० लाभार्थ्यांना या शिबिरातून थेट लाभ मिळाल्याचे समोर आले आहे.
या यशामुळे उत्साहित होऊन, पाचोरा मंडळात दरवर्षी असे ४ छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली. जास्तीत जास्त लाभार्थी आणि नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. हा उपक्रम प्रशासनाचे नागरिकांप्रति असलेले दायित्व दर्शवतो आणि सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचवण्यात मैलाचा दगड ठरेल अशी आशा आहे.