महिलेचा निर्घृण खून; डोक्यात दगड घालून मृतदेह फेकला गोणीत !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ४५ वर्षीय अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून, तिचा मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही भीषण घटना बुधवारी (२५ जून) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमठाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परतत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा मृतदेह गोणीत टाकून फेकलेला आढळला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि डोक्यात दगड मारल्याचे स्पष्ट दिसत होते. ही घटना साधारणतः दोन दिवसांपूर्वी घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हा परिसर अमळनेर आणि पारोळा तालुक्यांच्या सीमेवर असल्याने, सुरुवातीला अमळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु, तपासानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत घडल्याची खात्री झाली. रात्री १० वाजल्यानंतर पारोळा येथील पोलीस उपनिरीक्षक अमरदीप गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, सुनील हटकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या मृत महिलेची ओळख पटलेली नव्हती. पारोळा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मयत महिलेची ओळख पटवावी असे आवाहन पारोळा पोलीसांनी केले आहे.