Home क्राईम यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

0
51


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथे तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फैजपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजेंद्र तेली (वय ३५ वर्षे) हे यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कारकून म्हणून कार्यरत होते. ते फैजपूर येथील सराफ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. बुधवार, दिनांक १७ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सागर तेली यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर तेली यांचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

या घटनेची खबर गुणवंत दिलीप तेली यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू असून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मयत सागर तेली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound