ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बहिणीसह दोन भावांचा करूण अंत

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । दोन हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत दुचाकीस्वारांना चिरडले. यात तिघे बहिण -भाऊ जागीच ठार झाले. हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. मृत तिघेही बहीण-भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दरवाडे यांनी दिली. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघे जण परभणी जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर तिघांचे मृतदेह पडले होते तर रक्तामांसाचा चिखल झाला होता. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी ही माहिती समोर आली आहे. अपघातीची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलिस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content