माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन

नवी दिल्ली । माजी कसोटीपटू तथा माजी खासदार चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी आज शेवटचा श्‍वास घेतला.

चेतन चौहान (वय ७३) यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. यातून ते बरे झाले होते. तथापि, दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांनाच आज दुपारी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी दिली. गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

चेतन चौहान यांनी १९६९ ते १९७८ या कालावधीत ४० कसोटी सामने खेळले. त्यांनी ३१.५७च्या सरासरीनं २०८४ धावा केल्या असून त्यांच्या नावावर १६ अर्धशतकं आहेत.

चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर १० शतकी भागीदारी आहेत. १९८१मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.

चेतन चौहान यांनी उत्तर प्रदेश येथील अमरोह येथून १९९१ व १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. ऑगस्ट २०१८मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांना युवा व क्रीडा मंत्रीपद देण्यात आले होते. चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज व्यक्तीमत्वाचा अखेर झाल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content