भडगाव तालुक्यात कृषी केंद्रांची झाडाझडती

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांना रास्त दरात बियाणे व कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात याकरिता भरारी पथकाची स्थापना करून तालुक्यात विविध कृषी केंद्रांच्या अचानक तपासणी करण्यात येत आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमिवर, तालुक्यात कृषी खात्यातर्फे तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक तयार करण्यात आले आहे. यासोबत सदर पथकामध्ये पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्यासह महेश वाघ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे सदस्य सचिव आहेत. सदर पथका मार्फत गेल्या महिन्याभरापासून विविध तपासण्या करण्यात येत असून विविध कृषी केंद्रांना तपासणी मधील आढळलेल्या तृटीं बाबत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.

शेतकरी संघटनेने तालुक्यातील शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुक्यातील कृषी केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून शेतकर्‍यांना रास्त दरात बियाणे व खते उपलब्ध करून देणे बाबत तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने आज तालुक्यातील १५ ते २० विविध कृषी केंद्रांवर डमी गिर्‍हाईक पाठवून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत कृषी वैभव ऍग्रो एजन्सी भडगाव व शिवार ऍग्रो सर्विसेस भडगाव या ०२ कृषी सेवा केंद्रावर कबड्डी व ले पंगा या तुलसी सिडच्या कापूस बियाण्याची किंमत १२०० रुपये सांगितल्याचे रेकॉर्डींग मध्ये सिद्ध झालेले आहे सदर बाबत जिल्हास्तरीय भरारी पथकातील अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख, कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांच्या पथकाने सदर कार्यवाही केलेली आहे.

या चौकशीत तथ्य आढळून आल्याने सदर कृषी केंद्रांना नोटीसा देण्यात आलेल्या असून सदर कृषी केंद्रांच्या विक्री परवानावर पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी जळगाव यांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तरी कोणीही बियाणे ज्यादा दराने विक्री करू नये, विक्री केल्याचे आढळून आल्यास परवाना निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच शेतकर्‍यांनी ज्यादा दराने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क करून तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे तसेच शेतकर्‍यांनी कुठल्याही एका वाणाची मागणी न करता रास्त दरानेच बियाणे पक्क्या बिलातच व परवानाधारक विक्री केंद्र मधूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. यापुढेही कृषी विभागाचे कृषी केंद्रांवर बारकाईने लक्ष असून कोणीही शेतकर्‍यांची फसवणूक केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

दरम्यान, या संदर्भात – विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ म्हणाले की, नाशिक विभागात जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली असून शेतकर्‍यांना रास्त दराने बियाणे व खते वेळेत उपलब्ध होतील व कोणत्याही शेतकर्‍याची फसवणूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. ज्यादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे आढळून आल्यास परवाना निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सर्व परवाना अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

Protected Content