सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या “वेबसाईटवर’ बंदी घाला

भडगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक तथा आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या वेबसाईटवर तात्काळ बंदी घालून लेखकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त माळी समाजाने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या वेबसाईटवर एका लेखकाने खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह लिखाण केले असून ‘शरयू ट्रस्ट’ नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती- फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा निषेध समस्त माळी समाज भडगाव तालुका वतीने करण्यात आला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र माळी समाज महासंघ विभागीय अध्यक्ष सागर शिवदास महाजन, महात्मा फुले बहुद्देशीय संस्था अध्यक्ष भिकन महाजन, समस्त माळी समाज भडगाव तालुका अध्यक्ष देवराम महाजन, समस्त माळी समाज भडगाव तालुका संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन, प्रदीप महाजन, विनोद महाजन, संतोष महाजन, संतोष पाटील, देविदास महाजन, दिनेश महाजन, सोपान महाजन, दीपक महाजन आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content