दागिने बनवताना पावडरचा वापर करून सर्रास फसवणूक

gold jwellary

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण कमी दरात सोने खरेदी करण्यासाठी प्रयत्नात असतात. मात्र, तुम्हीही स्वस्त दरात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
स्वस्त दरातील सोने आणि ऑफर्सकडे ओढा असलेल्या या ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा काहीजण उचलत असल्याचे समोर आले आहे. दागिन्याला एक विशिष्ट पावडर लावून सोन्याच्या दरात ग्राहकांना दागिने विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

 

परदेशातून आणलेल्या या सिमेंटसारख्या पावडरचा वापर ग्राहकांच्या फसवणुकीसाठी करण्यात येत आहे. सुरुवातीला सोन्याच्या चेनमध्ये या पावडरचा वापर करून ग्राहकांना फसवण्यात येत होते. आता मात्र, या पावडरच्या आधारे दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. दिल्लीच्या ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनीही अशाप्रकारची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्याची माहिती दिली आहे.

परदेशातून आयात करण्यात आलेल्या पावडरचा वापर दागिन्यात केला जातो. साधारणपणे दागिन्यामध्ये पावडरची भेसळ करण्यात आली आहे, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे काही ज्वेलर्स याचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वस्त दरात सोने खरेदी करत असल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. बाजार भावारपेक्षा कमी दरात असलेले सर्वच सोने बोगस असल्याचा दावा कोणी करत नाही. काही ज्वेलर्स आपल्याकडील दागिन्याचा जुना साठा संपवण्यासाठी कमी दरात विक्री करतात. त्यामुळे सोने खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोने खरेदी करताना घेण्याची काळजी

– हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत.
– स्वस्तातील सोने खरेदी करण्याच्या लोभास बळी पडू नका.
– स्थानिक ज्वेलर्सकडून दागिने खरेदी केल्यास बिल नक्की घ्या.
– हॉलमार्क नसल्यास दागिने खरे की खोटे याची पडताळणी नक्की करा.

Protected Content