एमआयडीसीतील एम-सेक्टरमधील गोडाऊनवर छापा

१४ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखू जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील एम-सेक्टर मधील गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यामध्ये १४ लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी एका तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एम-सेक्टर मधील एका गोडाऊनमध्ये बेकायदेशीर रित्या शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला तंबाखू यांची साठवणूक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यामध्ये सुमारे १४ लाख रुपयांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू हा जप्त करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरालाल उत्तम पाटील (वय-३८, रा. पिंप्राळा, जळगाव ) या तरुणा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Protected Content