डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा : अशोक चव्हाण


dr.payal tadavi

मुंबई (वृत्तसंस्था) नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत असलेल्या काही सहकारी डॉक्टरांना खूपत होती. आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून पायलला नेहमी जातीवाचक टोमणे मारले जात होते. याबाबत पायलने वारंवार तक्रार देखील केली होती, अशी माहिती आहे. असे असतानाही तीच्या तक्रारीची वेळीच योग्य दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारीवर वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती तर कदाचित ही दुःखद घटना टाळता आली असती.

डॉ. पायल तडवी आदीवासी समाजाची होती. तिचा जातीवरून मानसिक छळ केला जात होता, या रॅगिंगला कंटाळून तीने आत्महत्या केली. उच्चशिक्षित लोकांच्या मनातूनही जात जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे. समाजात अजूनही जातीच्या भिंती असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here