लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी घेताना परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत. हे कळावे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी देणारे अधिकारी यांची नावे जाहिर केली आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात प्रचार तथा निवडणुकी संबंधित विविध बाबी करिता विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यामुळे परवानगी देण्याच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फतच परवानगी मिळणार आहे. पोस्टर्स झेंडे कापडी बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यासाठीस्थानिक स्वराज्य संस्था,महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. खाजगी जागेवर फलक व प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल.

प्रचार वाहनाच्या परवानगीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजना, तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजनाहे परवानगी देतील.राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना प्रचार वाहन परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव हे परवानगी देणारी अधिकारी असतील. उमेदवाराच्या तात्पुरते प्रचार कार्यालय उघडण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परवानगी देतील. हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवणे करिता अप्पर जिल्हा दंडाधिकारी हे परवानगी अधिकारी असतील. ध्वनी क्षेपणाची परवानगी देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी हे परवानगी देतील. विविध शाळांच्या मैदानावर सभा घेण्याकरिता ना हरकत दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून मिळेल. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच प्रिंट मीडियावर ( मतदानाच्या पूर्वीचे शेवटचे 48 तास ) प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती तसेच बल्क मेसेजेस यांच्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी हे परवानगी अधिकारी असतील. फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर, पोस्टर व इतर प्रचार साहित्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत परवानगी मिळेल. मिरवणूक,पदयात्रा, रॅली,प्रचार फेरी,रोड शो याकरिता संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे परवानगी अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबतच उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी suvidha candidate App किंवा ENCORE या वेब पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येतील.

Protected Content